अमरावतीचे मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर राजकारण तापलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवरायांचा पुतळा हटवल्यामुळे बडनेराचे आमदार रवी राणांचा यांच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकून निषेध नोंदवल्याचा आरोप होत आहे. दरम्यान आयुक्तांच्या तक्रारीनंतर रवी राणा यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपांवर आमदार रवी राणा यांनी स्पष्टीकरण दिलं असून यामध्ये आपला कोणताही हात नसल्याचा दावा केला आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सुडबुद्दीने माझ्याविरोधात आरोप केले जात असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.
“माझ्यावर गुन्हे दाखल करुन रवी राणांचा कोणत्यातरी गुन्ह्यात अडकवलं पाहिजे असा इशारा उद्धव ठाकरेंनी अमरावतीमधील पोलीस आयुक्तांना दिला. महाराष्ट्राचे डीजीदेखील यात सहभागी आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या विषयावर कोणी काही बोललं तर त्याला अडकवायचं, फसवायचं, अटक करायची असा प्रकार सुरु आहे. महाराष्ट्रात गेलो तर अटक करुन जेलमध्ये टाकतील असे मला पोलिसांचे फोन येत आहेत,” असं रवी राणा यांनी यावेळी सांगितलं.
“मी कुठे फरार नसून अमरावतीत जाणार आहे. माझ्याविरोधात चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले असतील तर मी सामोरं जाणार. माझा यात कोणताही सहभाग नसून मला फसवण्याचं हे राज्य सरकारचं कारस्थान आहे. मी त्याचा निषेध करतो,” असंही ते म्हणाले आहेत.“मी पळणाऱ्यांपैकी नाही. नितेश राणेंना ज्याप्रकारे फसवलं, किरीट सोमय्यांना जशी वागणूक दिली जात आहे, प्रसाद लाड यांच्याविरोधातही कारवाई करण्यात आली त्यावरुन जे ठाकरे सरकारच्या, कुटुंबाच्या विरोधात बोलतात त्यांनी जेलमध्ये टाकायचं हा एकतर्फी कार्यक्रम सुरु आहे. ठाकरे सरकारमध्ये कायदा सुव्यवस्था खिशात ठेवून द्वेषाचं राजकारण करत आहेत. ज्याप्रकारे नितेश राणेंवर कारवाई झाली तेच गुन्हे माझ्याविरोधात दाखल झाले,” असं रवी राणी म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, “संजय राऊतांनी काल जे वक्तव्य केलं. फडणवीसांना नागपूरला जाणं मुश्कील करु अशी धमकी दिली जात आहे. उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करा आणि त्यावरही कारवाई झाली पाहिजे. फडणवीसांसारख्या जबाबदार व्यक्तीला धमकी दिली जात असेल तर कारवाई झाली पाहिजे”.