• Sat. Nov 23rd, 2024

    काँग्रेस- नगर: अखंड हिंदू समाजाच्या नावाखाली नगर शहरात आयोजित केलेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळय़ाचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसने ‘हायजॅक’ केल्याप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्यावर शिवसेना व काँग्रेसने सडकून टीका केली आहे. छत्रपतींच्या पुतळय़ासमोर अश्लील गाणे लावून त्यावर नाचणाऱ्या आमदार जगताप यांनी पुतळय़ासमोर नाक रगडून माफी मागावी, अशी मागणी शहर काँग्रेसने पत्रकार परिषदेत केली.  काल, रविवारी सायंकाळी शहरातील जुन्या बसस्थानकाजवळ अनेक वर्षांपूर्वी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला रंगरंगोटी करुन, तो नवीन असल्याचे भासवून, तशी वातावरण निर्मिती करून शिवप्रेमी व हिंदू समाजाची आ. जगताप यांनी फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे, तसेच या प्रकाराचा निषेधही केला आहे. आमदारांच्या नावाखाली गर्दी जमणार नाही, या उद्देशानेच स्टंटबाजी करत शिवप्रेमींची फसवणूक करण्यात आल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

    आमदार शहराच्या विकास कामात कमी पडतात, पुतळा परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पाहिली तर हे लक्षात येते. छत्रपतींच्या पुतळय़ाला केलेला रंगरंगोटीचा खर्चही महापालिकेने केलेला आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असतानाही लोकप्रतिनिधींनी दुखवटा पाळणे आवश्यक होते. परंतु जगात काय चालले आहे, ते त्यांना माहिती नसते, अशी टीका काळे यांनी केली. सोहळय़ात ध्वनिवर्धकावर पोवाडे, महाराजांचे गुणगान वाजवले जाणे आवश्यक असताना अश्लील गाणे वाजविण्यात आले. या अश्लील गाण्यांवर आमदारांनी नाच केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा लोकार्पण कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या आमदारांनी शिवप्रेमी, हिंदूत्ववादी संघटनांच्या भावनेशी खेळ करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी निषेध केला आहे.

    कार्यक्रम छत्रपतींचा होता, अखंड हिंदू समाजच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. शिवप्रेमींनी त्यासाठी शहरात स्वखर्चाने फलक लावले होते. महापालिकेने पुतळय़ासाठी खर्च केला, महापौरांनी आदेश दिला होता, परंतु कार्यक्रम राष्ट्रवादीच्या आमदारांनी ‘हायजॅक’ केला. त्यांची ही नेहमीची सवय आहे. केवळ स्वत:चा उदोउदो करण्यासाठीच त्यांनी स्वत:चे पोस्टर तिथे झळकवले.  कार्यक्रमाच्या ठिकाणी छत्रपतींऐवजी आमदारांच्या नावाच्या घोषणा दिल्या गेल्या. महाराजांचे पोवाडे वाजवण्याऐवजी ‘चुम्मा, चुम्मा’ सारखी चुकीची गाणी वाजवली गेली, अशी टीका राठोड यांनी केली.

    Share With Your Friends If you Loved it!